आळंदी-पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे ‘या’ दिवशी होणार उद्घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखी मार्गाचे सद्यस्थितीला 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. मी या कामाबाबत समाधानी असून, हीच कामाची गती लक्षात घेता डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण होईल आणि नवीन वर्षात पालखी मार्गाचे उद्घाटन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रातील आळंदी व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी हवाई मार्गे पाहणी केली. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व अधिकारी यांनी उपस्थिती लावली होती. यानंतर गडकरींनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी मंत्री गडकरी म्हणाले की, दरवर्षी पंढरपूरला पालखीने लाखो वारकरी देहू आणि आळंदी या मार्गे पायी जातात. या भाविकांच्या दृष्टीने पालखी मार्ग विस्तार करण्याचे ठरविले आणि ते लवकरच पूर्ण होणार आहे. त्या गोष्टीचा मला आनंद आहे. राज्य सरकारने एकूण 24 पालखी स्थळाच्या ठिकाणी 10 हजार नागरिकांची व्यवस्था होईल, अशा स्वरुपाचा हॉल बांधवा. इतरवेळी तो हॉल लग्न कार्यासाठी उपलब्ध करून द्यावा. त्यातून मेंटेनन्स मार्गी लागेल.

आज पालखी मार्गाची हवाई पाहणी केली. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – 965) हा 234 किमी लांबीचा मार्ग हडपसर (पुणे) – सासवड – जेजुरी – निरा – लोणंद – फलटण – नातेपुते – माळशिरस – बोंडले – वाखरी – पंढरपूर अशा चौपदरी रस्त्याच्या कामांचा आढावाही घेतला आहे. यावेळी उजनी धरणाची पाहणी केली. त्या धरणातील गाळ महामार्गाच्या कामासाठी उपलब्ध झाल्यास कामाचा अधिक दर्जा प्राप्त होईल आणि धरणाचे खोलीकरणदेखील होईल. त्यामुळे भविष्यात पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. हे लक्षात घेऊन उजनी धरणातील गाळ मिळवा, अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे.

पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूस 18 हजार 840 वृक्ष लावणार

सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात 57,200 व दोन्ही बाजूस मिळून 18,840 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि बाबींवर आधारित काम करण्यात येणार आहेत. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल, असे मंत्री गडकरी यांनी सांगितले.