कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोव्हीड नियमांचे पालन व सरकारने केलेल्या आवाहनाला राज्यातील जनतेने सकारात्मक प्रतिसाद देऊन गणेशोत्सव साजरा केला. गेल्या दहा दिवसात उत्साहात व आनंदात गणपती सण साजरा करण्यात आला. त्याचबरोबर शासनाच्या नियमांचे गणेश भक्तांनी केल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मानले.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड शहरातील गणपती विसर्जनाच्या नियोजनाची पाहणी केली. तसेच शहरातील गणेश मंडळांना भेटी देवून गणपतीची आरतीही केली. यावेळी लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, शिवाजी पवार, जयंत बेडेकर, अख्तर आंबेकरी उपस्थित होते.
प्रितीसंगम घाटावर कोयना नदीत नगरपालिकेकडून शहरातून संकलित केलेल्या गणेशमूर्तीची आरती करुन विसर्जनास सुरुवात करण्यात आली. कराड नगरपालिका व कराड शहर पोलिस यांनी शहरातील गणेश मूर्ती संकलित केलेल्या होत्या. तसेच शहरात ठिकठिकाणी जलकुंड ठेवून मूर्तीचे विसर्जन करण्यात आल्या. या मूर्ती नियोजनबध्द उत्तमरित्या केलेले असल्याने गृहराज्यमंत्री यांनी प्रशासनाचे काैतुक केले.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, चालू वर्षी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे गणेश भक्तांनी पालन केले. तरूण मंडळांनीही शासनाला सहकार्य केले. या उत्सवात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय किंवा गालबोट लागले नाही. राज्य सरकारला तसेच पोलिस खात्याला गणेश भक्तांनी सहकार्य केले आहे. त्याबद्दल मी राज्यातील गणेश भक्तांचे आभार मानतो.