औरंगाबाद – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच रावसाहेब दानवे हे विशेष बोगीतून प्रवास करीत मंगळवारी सकाळी औरंगाबादरेल्वे स्टेशनवर दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती. पुष्पहार, पुष्पगुच्छ देण्यासाठी अक्षरशः लोटालोटी झाली.
रावसाहेब दानवे हे सचखंड एक्स्प्रेसने औरंगाबादला येणार होते. मात्र, सचखंड एक्स्प्रेस तब्बल ३ तास उशीरा धावत असल्याने ऐनवेळी नियोजन बदलावे लागले. देवगिरी एक्स्प्रेसला विशेष बोगी जोडून दानवे हे औरंगाबादेत पोहोचले. रेल्वेराज्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा औरंगाबादला आल्याने रेल्वेस्टेशन शेकडो कार्यकर्ते जमले होते. सर्वांचे स्वागत स्विकारत दानवे रेल्वेस्टेशनवरून रवाना झाले.
त्यांच्या या दौऱ्यामुळे रेल्वे स्टेशनवर विविध खबरदारी घेण्यावर भर दिला गेला. स्वच्छतेपासून तर सोयीसुविधांच्या बाबतीत कोणतीही त्रुटी निदर्शनास येणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती. मात्र, रेल्वे राज्यमंत्री नाराजी व्यक्त करतील, असा कोणताही प्रसंग उदभवला नाही. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.