औरंगाबाद – शिवसेनेचे पैठणचे आमदार तथा मंत्री संदिपान भुमरे यांच्या भावाने कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या कामाची तक्रार केल्याने मारहाण करण्यात आली. रणजित नरवडे असे या मारहाण झालेल्या संबंधित व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात संदिपान भुमरे यांचे भाऊ राजू भुमरे यांच्यासह आठ जणांवर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रणजित नरवडे यांनी रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. 2018 मध्ये रस्त्याचे काम न करताच बोगस बिल उचलल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले होते. तक्रार केल्यानंतर घाईगडबडीने कामाला सुरुवात देखील करण्यात आली. मात्र याचा राग मनात धरून, संदिपान भुमरे यांचे भाऊ राजू भुमरे यांनी आपल्याला लाथा, बुक्क्याने मारहाण केली, अशी तक्रार नरवडे यांनी केली आहे.
विशेष म्हणजे रणजित नरवडे हे संदिपान भुमरे यांचे नातेवाईकच आहेत. नरवडे हे भुमरे यांच्या मामाचा मुलगा आहे. राजू भुमरे यांनी आपल्याच मामाच्या मुलाला मारहाण केली. घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात संदीपान भुमरे यांचे भाऊ राजू भुमरे यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आमदारांना सत्तेची गुर्मी चढल्याची चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे.