कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी
कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत एक महिन्याच्या आत बैठक लावणार आहे. या प्रश्नाबाबत सुरू असलेले आंदोलन धरणग्रस्तांनी तात्काळ आपले सुरू केलेले आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
मंत्री शंभूराज देसाई यांनी कोयनानगर येथे आंदोलकांची नुकतीच भेट घेतली. तसेच यावेळी आंदोलक व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेत चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीस श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे, तहसीलदार रमेश जाधव, पुनर्वसनचे तहसीलदार विवेक जाधव, सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री देसाई म्हणाले की, कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर व कायमस्वरूपी सोडवणे हा शासनाचा उद्देश आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी एक साचेबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाने काम सुरू केले आहे. तसेच ज्या धरणग्रस्तांना अद्याप कोणताही लाभ मिळालेला नाही त्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल.
मंत्री शंभूराज देसाई यांनी कोयनानगरमधील धरणग्रस्थाची भेट घेतली pic.twitter.com/XOWAnGpHkg
— santosh gurav (@santosh29590931) March 28, 2023
कोणत्या गावात पुनर्वसन योग्य जमीन आहे त्याची यादी तलाठी सजा, ग्रामपंचायत येथे उपलब्ध करावी.लाभ द्यावयाच्या धरणग्रस्तांची यादी लवकरात लवकर पूर्ण करावी, सर्व यंत्रणांनी समन्वयाने युद्ध पातळीवर हेकाम पूर्ण करावे, अशा सूचना यावेळी मंत्री देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.