सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
मेडिकल शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेलेल्या कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथील ऐश्वर्या सुनील पाटील व कडेपूर येथील शिवांजली दत्तात्रय यादव या दोन विद्यार्थीनी सुखरूप आहेत. या दोन्ही विद्यार्थिंनीसह १५ भारतीय विद्यार्थी खरकीव्हमधून रोमानियाला ट्रेनने रवाना झाले असून पुढे ते हंगेरी बोर्डवर येणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना दिली.
मंत्री कदम यांनी शिवांजली व ऐश्वर्या या दोघीशी व्हिडिओ कॉलिंगवरून संवाद साधला. ‘तुम्ही घाबरू नका, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहे. तुम्हाला देशात आणण्यासाठी वरिष्ठ मंत्र्यांशी वारंवार चर्चा सुरू असून लवकरच तुम्ही मायदेशात याल,’ असे सांगत कदम यांनी संबंधित विद्यार्थिनींना दिलासा दिला. दरम्यान, मागील ६ दिवसापासून रशियाचा युक्रेनवर भ्याड हल्ला सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री कदम यांचे या विद्यार्थिंनीना मायदेशात आणण्यासाठी युद्धाच्या पहिल्या दिवसापासून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आज त्यांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारा या विद्यार्थिनीशी संपर्क साधला. यावेळी सुखरूप असल्याचे विद्यार्थिंनी सांगितले. तसेच आज पहाटे आम्ही दोघी आणि १५ भारतीय विद्यार्थी खरकीव्हमधून रोमानियाकडे रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले.