हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना पोलिस मारहाण प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर आता यशोमती ठाकूर यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिले आहे. भाजपला माझ्याकडे राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही. आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा, नंतरच मला राजीनामा मागा, असा पलटवार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तिवसा येथे आंदोलन करत यशोमती ठाकूर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी केली. मात्र चंद्रकांत पाटील यांचं आंदोलन केविलवाणं असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली.
माझ्यावर लावलेले गुन्हे हे राजकीय आकसापोटी आहेत. मात्र कलम 420, 307, 302 अंतर्गत गुन्हे असलेले भाजपचे नेते मोकळे फिरत आहेत. त्यामुळे आधी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागावा, नंतरच माझा राजीनामा घ्यावा. भाजपला माझा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही, असा पलटवार ठाकूर यांनी केला.
काय आहे प्रकरण-
पोलीस कॉन्स्टेबल मारहाण प्रकरणात महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना दिलासा मिळाला आहे. यशोमती ठाकूर यांची शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर शिक्षेला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली. आठ वर्ष जुन्या प्रकरणात यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’