मुंबई प्रतिनिधी । महाविकासाआघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन दिवस उलटून गेले तरी खातेवाटपाचा मुहूर्त काही निघत नाही आहे. खातेवाटपाबाबत महाविकासाआघाडीतील तिन्ही पक्षात बैठकांचे सत्र पार पडत आहेत. मात्र खातेवाटप कधी होणार यावर अजून सस्पेंस कायम आहे. खातेवाटपासंबंधी नेमकं कोण उशीर करत आहे यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. याबाबत आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राऊत म्हणाले, “खातेवाटपावरून महाविकास आघाडीत कोणतीही कुरबूर नाही. तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटप झालेलं आहे. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून विलंब झालेला नाही. आज सायंकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल,” अशी माहिती राऊत यांनी दिली.
आधी सरकार स्थापन त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार अशा दोन्ही वेळी मॅरेथॉन बैठका पार पडत अखेर महाविकाआघाडीचे सरकार अस्तित्वात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महिनाभरानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर खातेवाटपसंदर्भातही विलंब होत असल्यानं महाविकास आघाडीत खातेवाटपावरून कुरबुरी सुरू असल्याचं राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शेवटी या चर्चेला पूर्णविराम देत संजय राऊत म्हणाले, “महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये संवाद राहावा. अनेक मुद्यांवर चर्चा व्हावी म्हणून शरद पवार यांनी सुकाणू समिती स्थापन करण्याची सूचना केली होती. या समितीतील तिन्ही पक्षाचे नेते भेटत असतात. खातेवाटपावरून कोणतीही कुरबूर नाही. तिन्ही पक्षांमध्ये आधीच खातेवाटप झालेलं आहे. पक्षातंर्गत खातेवाटपाचा प्रश्न शिल्लक होता. तोही जवळपास सुटला असून, संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल,” असं राऊत म्हणाले. आधी सरकार स्थापन त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार अशा दोन्ही वेळी मॅरेथॉन बैठका पार पडत अखेर महाविकाआघाडीचे सरकार अस्तित्वात आलं.