औरंगाबाद – औरंगाबाद ते अंकाई (मनमाड) या 98 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरी करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. रेल्वे मंत्रालयाने या दुहेरी करण्यासाठी अंतिम भूखंड सर्वेक्षणाला मंजुरी दिली असून यासाठी 1 कोटी 96 लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.
मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या मनमाड परभणी या 291 किलोमीटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाला पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचे कारण दाखवत रेल्वे मंत्रालयाने रेड सिग्नल दाखवल्याने गुंडाळल्या गेले. रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने दुहेरी करण्याला प्राधान्य देते. सध्या परभणी-मनमाड या मार्गाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याने दुहेरी करण्याची आवश्यकता नसल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत उत्तरा दरम्यान सांगितले होते. मात्र त्याच वेळी अंकाई ते औरंगाबाद 98 किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आल्याचे स्पष्ट केले.
रेल्वे बोर्डाने दक्षिण मध्य रेल्वेला काल दिलेल्या पत्रानुसार औरंगाबाद ते अंकाई या रेल्वे मार्गाला मंजुरी दिल्याचे समोर आले आहे यासाठी रेल्वे मंत्रालयाने 1 कोटी 96 लाख रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. आता या मार्गावर दुहेरीकरण झाल्याने रेल्वेगाड्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, तसेच रेल्वेचा वेगही वाढेल.