नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर याठिकाणी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये पतंग पकडण्यासाठी धावणाऱ्या एका 7 वर्षीय चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. या चिमुकल्याचा पतंग पकडण्यासाठी धावत असताना अंदाज न आल्याने विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. हि घटना सोमवारी घडली. मृत पावलेल्या 7 वर्षीय चिमुकल्याचे नाव प्रज्वल पांडुरंग आव्हाड असे आहे. घटनेच्या दिवशी तो आपल्या मित्रांसोबत पतंग उडवत होता. यावेळी पतंग तुटल्याने मृत प्रज्वल आणि त्याचे मित्र पतंग पकडण्यासाठी धावत होते.
यावेळी जवळच असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने प्रज्वल थेट विहिरीत जाऊन कोसळला. यावेळी त्याच्या मागे धावणाऱ्या तीन मित्रांनी त्याला हाका मारल्या पण आतून कोणताच प्रतिसाद न आल्याने ते सर्वजण मोठ्याने रडू लागले. यानंतर हि सगळी मुले घाबरलेल्या अवस्थेत रडत रडत घरी आले आणि त्यांनी संबंधित प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. या घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी तातडीने विहिरीकडे धाव घेतली. काही तरुणांनी विहिरीत उड्या घेऊन प्रज्वलला शोधण्याचा प्रयत्न केला. पण याचा काही उपयोग झाला नाही.
शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अडीच तासांच्या अथक प्रयत्न केल्यानंतर प्रज्वलचा मृतदेह बाहेर काढला. पतंग पकडण्याच्या नादात प्रज्वलचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना देण्यात आली असून ते या घटनेचा पुढील तपास करत आहेत.