नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकालच्या जगात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या इंटरनेटचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेदेखील आहेत. याच संदर्भात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका 15 वर्षाच्या मुलाने वाय-फाय कनेक्शन बंद झाल्याने रागाच्या भरात आपल्या आई, वडील आणि लहान भावाची गोळी झाडून हत्या केली. एवढेच नाहीतर तो तीन दिवस त्यांच्या मृतदेहांसोबत घरातच बंद राहिला. हि घटना स्पेनमध्ये घडली आहे. या घटनेतील आरोपी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
स्पेनच्या एल्श शहरात घडलेल्या या तिहेरी हत्यांकाडामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ माजली आहे. या आरोपी अल्पवयीन मुलाने आपला गुन्हा मान्य केला आहे. शाळेत कमी मार्क्स मिळाल्याने आणि घरातील कामात मदत करत नसल्याने या मुलाच्या आईने त्याचं वाय-फाय कनेक्शन बंद केलं होतं. याचा आरोपी मुलाला राग आला आणि त्याने रागाच्या भरात शॉटगनने आपली आई, वडील आणि 10 वर्षांचा भाऊ यांची गोळी मारून हत्या केली.
आपल्या परिवाराची हत्या केल्यानांतर आरोपी तीन दिवस या मृतदेहांसोबत घरातच बसून राहिला आणि नंतर त्याने आपल्या नातेवाईकांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली. यानंतर आरोपीने एल्श पोलीस ठाण्यात जाऊन आपला गुन्हा मान्य केला आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या तिहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.