मराठवाडा हादरला ! अल्पवयीन मुलीवर तब्बल चारशे जणांनी केला अत्याचार 

crime 2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड – काही दिवसांपूर्वी डोंबिवली याठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर अनेक नागरिकांनी संताप्त व्यक्त केला होता. राज्याला हादरवून सोडणारी ही घटना ताजी असताना, अमानुषतेच्या परिसीमा गाठणारी आणखी एक घटना समोर आली आहे. बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 400 जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बालहक्क कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे हे प्रकरणं समोर आलं आहे.

संबंधित घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत सहा महिन्यांच्या काळात तब्बल 400 जणांनी तिच्यावर अत्याचार केला आहे. विशेष म्हणजे अत्याचार करणाऱ्यांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या वडिलांनी तिचं एका तरुणासोबत बालविवाह लावून दिला होता. लग्नानंतर सासरी नवरा सांभाळत नसल्याने पीडित मुलगी आपल्या वडिलांकडे राहायला गेली. पण वडिलांनीही तिला सांभाळण्यास नकार दिला. त्यामुळे असहाय्य आणि निराधार झालेली ही अल्पवयीन मुलगी अंबाजोगाई बसस्थानकावर येऊन राहू लागली. एकट्या मुलीला पाहून गेल्या सहा महिन्यात तब्बल 400 जणांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे.

बालहक्क कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे हा प्रकार समोर आल्यानंतर बालकल्याण समितीसमोर झालेल्या सुनावणीदरम्यान या घटनेला वाचा फुटली आहे. याप्रकरणी बालविवाह लावून दिल्याच्या कारणावरून वडिलांसह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर अत्याचार करणाऱ्या तीन संशयित आरोपींवरही गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीचा पुरवणी जबाब नोंदवला जाणार असून अत्याचार करणाऱ्या अन्य आरोपींची नावं यामध्ये उघड होणार आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.