अहमदाबाद : वृत्तसंस्था – मोबाईल हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. याच मोबाईलमुळे कित्येकांचं आयुष्यही उद्धवस्त झाले आहे. अशाच प्रकारची एक घटना गुजरातच्या सूरतमध्ये घडली आहे. यामध्ये एका वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलाला गेम खेळण्यावरुन सुनावले. याचाच राग मनात धरून मुलानं आपल्या वडिलांची गळा दाबून हत्या केली आहे. ही घटना सूरत शहरातील इच्छापोरा ठाण्याच्या क्षेत्रात असलेल्या कवास गावामध्ये घडली आहे. या ठिकाणी मृत अर्जून अरुण सरकार आपली पत्नी आणि मुलासोबत राहात होते. मंगळवारी अर्जून सरकार यांना त्यांची पत्नी रुग्णालयात घेऊन गेली मात्र त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पत्नी डॉली आणि अल्पवयीन मुलगा यांनी रुग्णालयात डॉक्टरांना असं सांगितलं, की अर्जून आठ महिन्याआधी बाथरुममध्ये पडले होते, तेव्हा त्यांना दुखापत झाली होती. मंगळवारी ते झोपले आणि पुन्हा उठलेच नाही. तेव्हा पोलिसांना मृत अर्जून सरकार यांची पत्नी डॉली आणि अल्पवयीन मुलाच्या बोलण्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी मृत अर्जून सरकार यांचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. या शवविच्छेदनामध्ये मृत अर्जून सरकारचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे.
यानंतर इच्छापोर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता 17 वर्षीय मुलानं पोलिसांना सांगितलं की तो दिवसभर मोबाईलवर गेम खेळत असे, यामुळे त्याचे वडील सतत त्याला ओरडायचे. याच कारणामुळे मंगळवारी वडील झोपेत असतानाच त्यानं त्यांची गळा दाबून हत्या केली. यानंतर पोलिसांनी मृत अर्जून सरकार यांची पत्नी डॉली आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. मोबाईलमध्ये गेम खेळण्यावरुन ओरडल्यानं मुलानं उचलेल्या या धक्कादायक पाऊलामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.