सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
मिरज-पुणे रेल्वेमार्गावर लोणंद ते सालपे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेगाड्या रोखण्यासाठी रेल्वे मार्गावर सिमेंटचे खांब ठेवणाऱ्या दोघांना मिरज रेल्वे पोलिसांनी अटक केली. लालसिंग कमलसिंग पंद्दू व सुखदेव बुटासिंग सरोते या दोघांनी दारूच्या नशेत लूटमारीच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. पद्दू व सरोते या दोघांनी लोणंद व सालपे या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे मार्गावर तीन ठिकाणी सिमेंटचे खांब ठेवून रेल्वेगाड्या आडविण्याचा प्रयत्न केला होता.
रेल्वे मार्गावर सिमेंट खांबामुळे महालक्ष्मी व गोवा एक्स्प्रेस काही काळ थांबविण्यात आल्या. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मिरज रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाचे घटनास्थळी धाव घेत, सिमेंटचे खांब हटवून रेल्वे वाहतूक सुरळीत केली. हा प्रकार करणाऱ्या पंद्दू व सरोते या दोघांना पोलिसांनी अटक केली. दोघांनी हा प्रकार दारूच्या नशेत रेल्वे प्रवाशांची लूटमार करण्यासाठी रेल्वे अडविण्यासाठी केला, का घातपातासाठी? याचा मिरज रेल्वे पोलीस तपास करीत आहेत. रेल्वे अडविण्याच्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती.