सांगली | खानापूर आटपाडी मतदारसंघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी सौ. शोभा बाबर तथा काकी यांचे आज (वय- 62) निधन झाले. पुणे येथील दिनानाथ मंगशेकर हाॅस्पीटलमध्ये गेल्या दहा दिवसांपासून उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
सौ. शोभा बाबर यांना न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने काही दिवस त्यांच्यावर विट्यात एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पुणे येथील मंगेशकर रुग्णालयात त्याना दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची प्रकृती प्रारंभी स्थिर होती. परंतु काही दिवसापासून प्रकृतीत चढ-उतार होत होता. आमदार अनिल बाबर हे शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते आहेत. गेल्या काही दिवसापासून मुलगा अमोल आणि सुहास आणि स्वतः आमदार अनिल बाबर हेदेखील पत्नीच्या उपचारावर सातत्याने लक्ष ठेवून होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी आमदार बाबर यांची थेट दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. दरम्यान शोभा बाबर यांच्या निधनाने संपूर्ण खानापूर मतदारसंघावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती, जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुहास बाबर आणि माजी नगरसेवक अमोल बाबर ही दोन मुले असा परिवार आहे. शोभा बाबर यांच्यावर आज (बुधवार) सायंकाळी विटा आणि गार्डीच्या सीमेवर असलेल्या पवई टेक परिसरातील जीवन प्रबोधिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.