हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आलेले अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना जिल्हा न्यायालयाने तीन महिने कारावास आणि 15 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा परिषदेच्या सभेदरम्यान गट विकास अधिकाऱ्याच्या दिशेने माईक आणि पाण्याच्या बाटल्या भिरकावल्याच्या प्रकरणात त्यांना न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
2019 ला आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड तालुक्यातील बेनोडा गावाच्या पाण्याच्या प्रश्नावरून गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांच्या अंगावर माईक आणि पाणी बॉटल फेकून मारली होती. या घटनेनंतर तत्कालीन कार्यकारी मुख्य अधिकारी मनिषा खत्री यांनी देवेंद्र भुयार यांच्याविरोधात तक्रारीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अखेर या प्रकरणात न्यायाधीशांनी कोर्टात आमदार देवेंद्र भुयार यांना कलम 353 भा.दं.वि. अन्वये 3 महिने कारावास आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जर देवेंद्र भुयार यांनी 15 हजार रुपये न भरल्यास त्यांना 1 महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
कोण आहेत देवेंद्र भुयार-
देवेंद्र भुयार हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेते अनिल बोंडे यांना पराभूत करून देवेंद्र भुयार विजयी झाले होते. काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हाकलपट्टी केली आहे.