हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बुलडाणा व मोताळा तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे हजारो शेतकर्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर आ. संजय गायकवाड यांनी तात्काळ मुंबईला जाऊन कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी बुलडाणा व मोताळा तालुक्यातील शेतकर्यांची व्यथा मांडली व अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
यावर्षी संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस होता. त्यामुळे पिकसुद्धा चांगले आले होते. मात्र, नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन आठवड्यात बुलडाणा आणि मोताळा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक नद्या, नाल्यांना पूर आला. पुरामुळे नदिकाठच्या शेतातील माती खरडून वाहून गेली. तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. या जास्तीच्या पाण्यामुळे पिके काळपटली आहेत. सोयाबीनच्या पिकांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.
मागील वर्षी अशीच अतिवृष्टी झाली होती. तेव्हाही शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. यावर्षी तर शेतकरी मागील वर्षापेक्षाही अधिक दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोना महामारीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांनी बँक व सोसायट्यांकडून कर्ज काढून पेरण्या केल्या आहेत. माझ्या मतदार संघातील बुलडाणा व मोताळा तालुक्यासह जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकर्यांना तात्काळ शासनाकडून भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी आ. संजय गायकवाड यांनी राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना केली आहे.