औरंगाबाद – बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभेचे आमदार सुरेश धस आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी तालुक्यातील इनामी जमिनी आपल्या मालकीच्या करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा गैर व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकाराखाली ही माहिती उघड झाली आहे. आष्टी येथील देवस्थाने आणि मशिदीच्या इनाम जमिनींमध्ये सुरेश धस यांच्या सांगण्यावरून आणि महसूल खात्याच्या आशीर्वादामुळे जवळपास 1000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे आणि अॅड असीम सरोदे यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे यांनी जारी केलेल्या एका पत्रकानुसार, खर्डा येथील विठोबा देवस्थान, आष्टीतील पिंपळेश्वर महादेव, मानूर येथील श्री विरुपाक्ष स्वामी गुरू, श्री गिरीस्वामी मठ, चिंचपूर दर्गा येथील जमिनींबाबत गैरव्यवहार झाल्याच आरोप करण्यात आळा आहे. देवस्थानांच्या व मशिदींच्या जमिनी उपभोगत होते, त्यांच्याकडून खूपच अल्पदरात इनाम जमिनी विकत घेऊन त्याच्यावर प्लॉटिंग सुरु केली आहे. यासाठी कोणत्याही प्रकारे वक्फ बोर्ड व धर्मादाय आयुक्त यांची पूर्व परवानगी घेतलेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. या जमिनी बळकावण्यासाठी चुकीची व खोटी कागदपत्रे पुरवण्यात आली आहे तसेच सर्व रोजनामे एकाच दिवशी तयार करुन खोटे रेकॉर्ड तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी मनी लाँडरिंग गुन्ह्यासाठी इडीकडे वेगळी तक्रार करणार असल्याचे राम खाडे यांनी सांगितले आहे.
सुरेश धस यांनी महसूल मंत्री हे पद भोगल्यानंतर त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यांचा जामगाव रोडवरील बंगलाच जवळपास 60 कोटी रुपयांचा असून त्यातील सर्व बांधकामाचे सामान हे परदेशातून आयात करण्यात आले आहे, असा आरोप राम खाडे यांनी केला आहे. या गैर व्यवहारांमध्ये मच्छिंद्र मल्टीस्टेट कॉ. क्रेडिट सोसायटीचे, आयसीआयसीआय बँकेचे डीडी वापरण्यात आले आहेत. सुरेश धस हे मल्टीस्टेट कॉ. चे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी या कार्यकारी संचालिका आहेत.