हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रविवारी परभणी येथे थायलंड येथील 6 फूट उंचीच्या 50 बुद्धरूप मूर्तींचे वितरण आणि वैश्विक धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत एक मोठे विधान केले आहे. यावेळी, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर भारताचे दोन तुकडे झाले असते” असे स्पष्ट मत विजय वडेट्टीवार यांनी मांडले आहे.
त्याचबरोबर, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोक्यात मुस्लीम धर्म स्वीकारण्याचा विचार आला असता, तर या भारताचे दोन तुकडे करावे लागले असते. आज वर दिल्लीत बसलेल्या लोकांनी हा विचार आपण केला पाहिजे. सध्या दिल्लीत गोपीचंद, फेकुचंद, तोरडमल हे लोक बसले आहेत. या लोकांचा विचार देखील देश तोडणारा आहे” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
दरम्यान, रविवारी परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर थायलंड येथील पंचधातूच्या 6 फूट तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचा वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, थायलंड येथील भिक्खू गगन मलिक यांच्यासह मोठया संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते. यावेळी बोलताना, “मंदिरातील दानपेट्या काढून टाकल्या, तर मंदिरात एकही पुजारी दिसणार नाही” असे देखील वक्तव्यं विजय वडेट्टीवार यांनी केले.