सोमवारपर्यंत वीजबिल माफ करा, नाहीतर खळखट्याक! मनसेचे अल्टिमेटम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । वीजबिल माफी देता येणार नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केल्यानंतर मनसेने वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारपर्यंत बील माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्या जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज दिला. वीजबिलात माफी देण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने राज्यातील साडे अकरा कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे जनतेत संतापाची भावना असून सोमवारपर्यंत बील माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्या जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, असं अल्टिमेटमचं नांदगावकर यांनी राज्य सरकाराला दिलंय.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही घोषणा केली. राज्यातील जनतेला वाढीव वीजबिल आले. सरकारने हे बील कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत सर्वांना निवेदनं दिली. पण वीजबिल माफ झाली नाही. उलट ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवून महाराष्ट्राचा घोर अपमान केला.

त्यामुळे राज्यातील जनतेची फसवणूक झाली असून जनतेत संतापाची भावना आहे. त्यामुळे आम्ही सरकारला येत्या सोमवारपर्यंत वीजबिल माफ करण्याचा अल्टिमेटम देत आहोत. जर वीजबिल माफ नाही केलं तर सोमवारनंतर जिल्ह्याजिल्ह्यात उग्र आंदोलनं होतील. लोकांचा संयम सुटला आहे. पब्लिक क्राय झाल्यास त्याला जबाबदार सरकारच असेल, असा इशारा नांदगावकर यांनी दिला. तसेच कुणाची वीज कापल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (mns announce agitation against electricity bill issue)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment