मुंबई | मनसे आणि भाजपची युती होण्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्या भेटीनंतर आज पुन्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मराठी मतांची बेरीज जुळणी करण्यासाठी युती केली जावू शकते, असे राजकीय जाणकारांच्यातून बोलले जात आहे.
राज ठाकरे यांच्या नव्या शीवतीर्थ या बंगल्यावर आज ही भेट झाली. काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंची भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीत काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र भेटीला नक्कीच काहीतरी राजकीय अर्थ असल्याचं सांगण्यात येत आहे.
राज ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जवळपास एक तासभर चर्चा केली. यात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर खलबतं झाली, हे अद्याप पुढे येऊ शकलेलं नाही. उद्यापासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. राज ठाकरे यांच्या शीवतीर्थ बंगल्यावर पहिल्यांदाच गणपतीची स्थापना होणार आहे. या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना त्यांनी या भेटीत आमंत्रण दिल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, अमित शाह 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौरा करणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांची रणनीती लक्षात घेता, मनसे-भाजपची ही जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे.