विशेष प्रतिनिधी । विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल काल लागला. अपेक्षेप्रमाणे महायूतीला जोरदार यश मिळाले. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातर्फे लढवलेल्या सर्व उमेदवारांची एक बैठक आपल्या निवासस्थानी बोलावली आहे. आज राज ठाकरे सर्व उमेदवारांची कृष्णकुंजवर भेट घेणार आहेत. राज्याच्या निवडणुकांमध्ये मनसे सहभागी होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती.
परंतु अखेरीस राज ठाकरे यांनी आपले १०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. पण या निवडणुकीत त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील विजली झाले. पाटील यांच्या रूपात मनसेला केवळ एकच विजय मिळाला.२०१४ च्या निवडणुकीतही मनसेला एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं.
कल्याण ग्रामीणमधून मनसेच्या राजू पाटील यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा ७ हजार मतांनी पराभव केला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात राजू पाटील यांनी बाजी मारली. अनेक ठिकाणी मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाला असला तरी मनसेच्या उमेदवारांनी काँटे की टक्कर दिल्याचं पहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी तर मनसेचे उमेदवार पराभूत होऊनही दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं पहायला मिळालं होतं. दरम्यान, राज ठाकरे आज सर्व उमेदवारांशी चर्चा करणार असून आत्मचिंतनही केलं जाणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.