हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोरोनावर मात केली आहे. राज ठाकरे यांच्या चाचणीचा अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. तसेच, राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई व त्यांची बहीण या देखील करोनामुक्त झाल्या आहेत.
राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे 23 ऑक्टोबर रोजी समोर आले होते. त्यानंतर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली असून राज ठाकरे हे कोरोनामुक्त झाले आहेत.
राज ठाकरेंचा मास्कला विरोध-
दरम्यान, भारतावर कोरोनाचे संकट असताना देखील राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नव्हता. कोरोनाची लागण होण्यापूर्वी त्यांनी पुणे तसेच मुंबई येथे अनेकदा कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. फक्त पुणे आणि मुंबईच नाही तर नाशिकचाहीदौरा राज ठाकरेंनी केलेला आहे. बहुतांश ठिकाणी राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नव्हता.