मनसेच्या ‘या’ नेत्याने केला राज ठाकरेंना शेवटचा ‘जय महाराष्ट्र’!; राजीनाम्याचं पत्र जसंच्या तसं

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणातून भोंग्याबाबतची भूमिका मांडली. जर मशिदीवरून भोंगे काढले नाही तर त्या समोरच मोठे भोंगे लावून हनुमान चालीसा ऐकवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. राज ठाकरे यांची ही भूमिका न पटल्याने पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. आता मनसेच्या एका मोठ्या नेत्यानेही राजिनामा दिला असल्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीद, मदरसेवरील भोंगे काढण्याबाबतच्या भूमिकावरुन नाराज असल्याच्या कारणाने मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी त्यांच्या सचिव पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा आज दिला आहे. इरफान शेख यांनी आपले ताजिनाम्याचे पत्र त्याच्या अधिकृत अशा फेसबुक अकाऊंटवर शेअर केले आहे. तसेच राजीनाम्याबाबत आपली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=697290108358416&id=100042322993937

इरफान शेख यांनी राज ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात आपली सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले आहेत की, “आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’..! खरं तर कधी अशी परिस्थिती समोर येईल असं वाटलं नव्हतं.मात्र आपण ज्या पक्षात काम करतो,ज्या पक्षाला आपलं सर्वस्व समजतो तोच पक्ष जर आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाच्या विरोधात द्वेषात्मक भुमीका घेत असेल आणि स्वतःहा पक्षाध्यक्षच जर भुमीका घेत असतील तर नक्कीच पक्षाला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याची वेळ आली आहे.

ब्लु प्रिंट,विकासाच्या भव्य दिव्य कल्पना एक दिवशी अचानक मस्जिदीवरील भोंगे आणि मदरस्यावर येऊन थांबतात तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून काहीतरी चुकीचं घडतंय हे सहज लक्षात येऊन जात. पक्ष स्थापन झाला तेंव्हा भूमिका होती की जातीपाती विरहित राजकारण करायचं.म्हणून सर्व जाती धर्माचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षात आहेत आणि जीवतोड मेहनत देखील करत आहेत.पक्षाचा झेंडा देखील सर्वसमावेशक होता.राज साहेब ठाकरे म्हणजे आशेचा एक नवा किरण होते मात्र पाडव्याच्या सभेत वेगळंच काहीतरी पाहायला आणि ऐकायला भेटलं!

म्हणे मदरस्यात छापे मारा पहा काय काय मिळत ! राज साहेब कित्येक गोरगरिबांच्या मुलांचे मदरस्यात शिक्षण होते. तिथे कधीच काही चुकीचं होत नाही.नसेल तर माझ्या सोबत चला मी दाखवतो मदरसे.मात्र बदनामी का ? मुस्लिम द्वेषाच्या धंद्यांवर ज्यांचे राजकारण चालतं.त्यांना मस्जिदच्या भोंग्या पासून त्रास होतो,मदरस्यानां बदमान करायचं काम त्यांचं आहे.अश्या शक्तींच्या मागे आपल्याला जायची गरजच का आली ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला का असल्या

राजकारणाची गरज का पडली? असा सवाल करीत शेख यांनी म्हंटले आहे की, मी ही एक राष्ट्रप्रेमी महाराष्ट्रातील मराठी मुसलमान आहे. एखाद्या समाजाला टार्गेट करून राजकारण करणं चुकीचं आहे.आणि त्या चुकीच्या गोष्टीत त्याच पीडित समाजाचा भाग म्हणून सहभागी होणे म्हणजे स्वतःशीच बेईमानी करण्यासारख आहे.त्यामुळे पक्षाच्या पदाचा प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा देत आहे…! असो, मा.राज साहेबांना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’!
आपला नम्र, इरफान शेख.