औरंगाबाद – शहरात आज शिवसेना विरुद्ध मनसे असा सामना रंगताना दिसत आहे. देशातील महागाईच्या विरोधात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येत आहे. तोच दुसरीकडे शिवसेनेच्या या मोर्चाच्या विरोधात मनसेचा प्रतिमोर्चा काढण्यात येत आहे. मात्र तत्पुर्वी शांततेच्या कारणास्तव औरंगाबादच्या पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे.
शिवसेना नेते अंबादास दानवे काल यांनी या मोर्चाविषयी काल माहिती दिली. ते म्हणाले, केवळ इंधन दरवाढीवर अवलंबून वस्तूंच्याच दरात वाढ झाली नाही तर मोबाइल फोनचे रिचार्ज, एटीएममधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेतही अधिक पैशांची कपात होत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सर्वच महाग आहे. अशा स्थितीत सामान्यांनी जगायचे कसे? या स्थितीचा निषेध करण्यासाठी शिवसेना औरंगाबादमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.
मनसेचा प्रतिमोर्चा –
शिवसेनेच्या या भूमिकेवर मनसेने आक्षेप घेतला आहे. मनसेचे सुहास दाशरथे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. महागाईविरोधात मोर्चाचे सोंग करण्यापेक्षा राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी कधी देणार? हे सांगावे. शिवसेनेने या प्रश्नांची उत्तरे द्यावी, मगच त्यांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, अशी भूमिका मनसेने मांडली आहे.