हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज ठाकरेंनी राज्यपालांना थेट भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं. संजय राऊतांच्या विधानाला मनसेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीदरम्यानचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत संजय राऊत हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाकून कोपरापासून दंडवत घालताना दिसत आहेत. ‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’, अशी कॅप्शन संदीप देशपांडे यांनी फोटोच्यावरती लिहली आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, हे पाहावे लागेल.
मे महिन्यात महाराष्ट्र कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना प्रशासकीय निर्णयांच्या अंमलबजावणीवरून महाविकासआघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यावेळी संजय राऊत यांनी राजभवन म्हणजे फालतू राजकारणाचा अड्डा झाल्याची टीका केली होती. या टीकेमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्रचंड दुखावले गेले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा संजय राऊत यांनी राज्यपालांना कोपरापासून दंडवत केला होता. भगतसिंह कोश्यारी हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, म्हणून मी असा नमस्कार केला, असे राऊत यांनी सांगितले होते. मात्र, आता मनसेकडून याच फोटोचा वापर करून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
महाराष्ट्राचा अपमान करतांना खुद्द संजय राऊत pic.twitter.com/7K7HqD8tEl
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 31, 2020
तत्पुर्वी, राज्यपालांना कार्यकारी अधिकार नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही काही लोक राज्यपालांना भेटत असतात. मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’