…. तेव्हा बाळासाहेबांचा ‘राजा’ ढसाढसा रडला; काका- पुतण्याच्या नात्यावर मनसेची खास पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात काका- पुतण्यांची चर्चा सतत रंगत असते. प्रत्येकी वेळी काकाने पुतण्याला राजकारणात आणलं आणि पुतण्याने मात्र काही काळानंतर काकाची साथ सोडत दुसरी वाट धरली असच चित्र महाराष्ट्राने पाहिले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वाद महाराष्ट्र्र बघत आहे. काल लातूर येथील एका कार्यक्रमात काका पुतण्याच्या नात्याबद्दल बोलताना अभिनेते रितेश देशमुख भावुक झाले. आपल्या काकांनी आपल्याला भरपूर साथ दिली असं म्हणत त्यांनी काका पुतण्याचे नातं कस असावे हे सांगितलं. याच कार्यक्रमात काँग्रेससाठी काका-पुतण्यांचं नातं धार्जिणं आहे, असं उपहासात्मक विधान जयंत पाटलांनी आज केलं. यानंतर मनसेने राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे या काका पुतण्याच्या नात्याबद्दल खास अशी पोस्ट केली आहे.

काय आहे मनसेची पोस्ट –

आज महाराष्ट्रात राजकीय कुटुंबातील काका – पुतण्या या नात्यावर अनेक जण व्यक्त होत आहेत. कुणी आपल्या काकांचं वय काढतोय, उर्मट बोलतोय तर कुणी काकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना गहिवरतो आहे… पण अशाच एका काका – पुतण्याचं निस्सीम प्रेम महाराष्ट्राने अनुभवलं आहे. ती दृश्य आजही महाराष्ट्राला स्तब्ध करतात. २०१२ साली बाळासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला जाणार होता आणि बराच काळ धीरगंभीर होऊन अंत्यसंस्कार पाहणाऱ्या श्री. राज ठाकरे ह्यांचा बांध फुटला… आणि बाळासाहेबांचा ‘राजा’ ढसाढसा रडला. आजही ते क्षण आठवले की, गहिवरुन येतं… हेच खरे मराठी संस्कार… अशी पोस्ट मनसेने सोशल मिडियावर शेअर केली आहे. या पोस्टसोबत राज ठाकरेंचा फोटो देखील मनसेने शेअर केला आहे.

रितेश देशमुख झाले होते भावुक –

विलास सहकारी साखर कारखाना परिसरात विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित कार्यक्रमात विलासराव देशमुख यांचे सुपुत्र रितेश देशमुख यांनी आपल्या काकांचे आभार मानले. साहेबांची उणीव कायम भासते. पण ही उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका नेहमी मागे उभे राहिले. याच्यासाठी उभे राहिले की, आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि नसली तरीही मी आहे. काकांना बऱ्याच वेळेस बोलता आलं नाही. पण, आज मी सर्वांसमोर सांगतो, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे याचं उदाहरण आज या स्टेजवर आहे. असं म्हणत रितेश देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.