औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. या खड्ड्यांतून वाट काढत वाहन चालवताना चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र मनपाच्या अधिकाऱ्यांना याचे सोयरसूतक नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी जळगाव रोडवरील सबीओए शाळेजवळ अधिकाऱ्यांचे बोथट संवेदनांचे पित्र पूजन आंदोलन केले.
स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या औरंगाबादेतील रस्त्यांची अशी अवस्था अधिकाऱ्यांना दिसत नाही का, असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला. तसेच महापालिका आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. हातात खड्ड्यांचे फलक दाखवून, हीच का तुमची स्मार्ट सिटी, असा सवाल करीत मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आठ दिवसांत हा व्हीआयपी रस्ता खड्डेमुक्त केला नाही, तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात बसविल्याशिवाय मनसे गप्प बसणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी दिला. या आंदोलनात सतनामसिंग गुलाटी, संदीप कुलकर्णी, अब्दूल रशीद खान, अशोक पवार पाटील, संतोष कुटे, नंदू नावपुते, अभय मांजरामकर,,गणेश साळुंके ,संदीप दांडगे, मनोज भिंगारे, राजू चव्हाण, बाबुराव जाधव, रुपेश शिंदे, चेतन पाटील, विशाल इराळे पाटील, प्रवीण मोहिते, राहुल कुलकर्णी, रवी गायकवाड, नितीन इंचुरकर, प्रशांत जोशी,कृष्णा घायट पाटील आदिंनी सहभाग नोंदविला.
आंदोलनासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त
आंदोलक अचानक रास्ता रोको करण्याची शक्यता लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलिस निरिक्षक संभाजी पवार, पोलीस निरीक्षक विनोद सलागरकर, कैलाश देशमाने, एपीआय श्रद्धा वायदंडे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, महादेव गायकवाड हे कर्मचाऱ्यांसह आंदोलनापूर्वी हजर होते.