Budget 2024 : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या देशाचे अंतरिम बजेट संसदेत सादर करणार आहेत. त्यापूर्वी देशातील जनतेला केंद्र सरकारने मोठी खुशखबर दिली आहे. सरकारकडून मोबाईल फोन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या आयातीवरील आयात शुल्क कमी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे त्यामुळे मोबाईलच्या किमती स्वस्त (Mobile Price Down) होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जनतेला मोठा फायदा होईल हे नक्की…
याबाबत अर्थमंत्रालयाकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महसूल विभागाने काढलेल्या या अधिसूचनेत म्हटलं आहे की, भारत सरकारच्या वित्त मंत्रालय अर्थात महसूल विभागाकडून क्रमांक 50/2017 सीमाशुल्क यांच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा केल्या आहेत. यानुसार, मोबाईल तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पार्ट्सवर आता 15 टक्क्यांऐवजी 10 टक्के आयात शुल्क आकारण्यात येणार आहे. आयात शुल्कात घट झाल्यामुळे मोबाईल फोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. कस्टम ॲक्ट 1962 च्या कलम 25 नुसार सरकारने जनहित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे असेही यात म्हंटल आहे.
Government of India slashes import duty on key components used in the production of mobile phones. The import duty has been reduced from 15 per cent to 10 per cent. pic.twitter.com/22CIz9Qoch
— ANI (@ANI) January 31, 2024
यावेळी, अर्थ मंत्रालयाने त्या मोबाईल पार्ट्सची नावे देखील शेअर केली आहेत ज्यांचे आयात शुल्क कमी केले गेले आहे. त्यानुसार सरकारच्या या निर्णयानंतर मोबाईल बॅटरी कव्हर, मेन लेन्स, सीलिंग गॅस्केट, फ्रंट कव्हर, मिडल कव्हर, बॅक कव्हर, जीएसएम अँटेना, पीयू केस किंवा सीलिंग गॅस्केट, किंवा पॉलिमरपासून बनविलेले पीपी, सिम सॉकेट, स्क्रू इत्यादी पार्टच्या किमती कमी होणार आहेत. अर्थसंकल्पापूर्वीच सरकारने हा निर्णय घेत देशातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. कारण मोबाईल हि आजकाल जीवनावश्यक गोष्ट बनली असून मोबाईलच्या माध्यमातून सर्व प्रकारची कामे आपण घरबसल्या करू शकतो.