देशात तयार होणार आधुनिक आधार केंद्रे; ‘या’ सुविधा मिळणार

नवी दिल्ली । UIDAI ने देशभरात आधुनिक आधार सेवा केंद्रे स्थापन करण्याच्या योजनेवर काम सुरू केले आहे. या आधुनिक आधार सेवा केंद्रांवर फक्त आधार कार्ड बनवलेच जाणार नाहीत तर ते अपडेटही केले जातील. ही केंद्रे आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार असून नागरिकांना आणखी मूलभूत सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

पहिल्या टप्प्यात, UIDAI ने देशात अशी 114 आधुनिक केंद्रे उभारण्याची योजना आखली होती. आतापर्यंत देशातील विविध शहरांमध्ये अशी 64 आधार केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात 53 शहरांमध्ये हे बसवले जाणार आहेत. या शहरांच्या लिस्टमध्ये महानगरे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानी आणि प्रमुख शहरांचा समावेश आहे. देशात आधीच 35 हजारांहून जास्त आधार केंद्रे कार्यरत आहेत, जे बँका, पोस्ट ऑफिस आणि इतर काही सरकारी आवारात सुरू आहेत.

सातही दिवस काम करेल
या आधुनिक आधार सेवा केंद्रांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आठवड्याचे सातही दिवस काम करतील. ही केंद्रे सकाळी 09:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत सुरू राहणार आहेत. आधारशी संबंधित सर्व कामांसाठी वन स्टॉप सेंटर असतील. येथे नवीन आधार तयार केला जाईल आणि अपडेट देखील केला जाईल.

चांगल्या सुविधा मिळतील
आधार सेवा केंद्रांवर येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या केंद्रांवर आणखी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यांच्याकडे एअर कंडिशनर असतील. बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था असेल. इतकेच नाही तर वृद्ध आणि दिव्यांगांसाठी व्हीलचेअरसह सर्व आवश्यक सुविधांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

ऑनलाइन अपॉइंटमेंट
आधार प्राधिकरणाने ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंग सर्व्हिस देखील सुरू केली आहे. वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रासाठी अपॉइंटमेंट बुक करू शकता. हे बुकिंग आधारशिवायही करता येईल. तसेच यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. लोकांना महिन्यातून 4 वेळा अपॉइंटमेंट बुक करण्याची सुविधा मिळेल.