विशेष प्रतिनिधी । संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतात. नव्या चेहऱ्यांमध्ये अधिकतर भाजपच्या मित्र पक्षातील नेत्यांना संधी मिळू शकते. मोदींनी ३० मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपमधील नेत्यांना अधिक संधी दिली होती. यात जेडीयू सारख्या पक्षातील एकही नेत्याचा समावेश नव्हता. याशिवाय शिवसेने सारख्या दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला केवळ प्रतिकात्मक प्रतिनिधित्व मिळाले होते.
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ तारखेला जाहीर होणार आहे. या दोन्ही राज्याचे निकाल जाहीर होण्याआधी मोदी सरकारने प्रशासनात मोठे बदल केले आहेत. मंगळवारी ११ सचिव आणि १२ ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. त्याच बरोबर गेल्या काही महिन्यापासून वादामुळे चर्चेत राहिलेले स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या नव्या आयुक्तांची निवड करण्यात आली.
जम्मू-काश्मीर कॅडरचे आयएएस अधिकारी ब्रज राज शर्मा यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परीक्षामध्ये झालेला गोंधळ आणि अनेक तक्रारीमुळे स्टाफ सिलेक्शन कमिशन चर्चेत आहे. शर्मा यांच्यासह संजीव नंदन सहाय यांची पॉवर सेक्रेटरीपदी नियुक्त करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काही दिवसात प्रशासनात आणखी काही बदल होण्याची शक्यता आहे. मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयातील टीम नव्याने तयार करण्यात आली होती. पण आतापर्यंत महत्त्वाच्या मंत्रालयातील सचिव बदलण्यात आले नव्हते.