हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मालदीवसोबत सुरू असलेल्या वादात भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकार आता मिनिकॉय बेटांवर नवीन विमानतळ बांधणार आहे. याठिकाणाहून लढाऊ विमाने, लष्करी विमाने तसेच, व्यावसायिक विमाने चालवण्यात येतील, अशी योजना भारत सरकारने आखली आहे. त्यामुळे आता लक्षद्वीप हे भारताची लष्करी ताकद बनणार आहे.
सध्याच्या घडीला लक्षद्वीप येथील आगतीमध्येच एकच हवाई पट्टी आहे. येथे सर्व प्रकारची विमाने उतरू शकत नाहीत. या योजनेमुळे पुढे जाऊन नौदल आणि हवाई दलासाठी हिंदी महासागर आणि अरबी समुद्रामध्ये ऑपरेशन करणे अधिक सोपे होऊन जाईल. तसेच चीनच्या वाढत्या कारवायांवर आळा घालण्यासाठी अनेक विविध योजना आखल्या जाते. मुख्य म्हणजे, मिनिकॉय बेटावर हवाई पट्टी बांधण्याचा पहिला प्रस्ताव भारताने दिला होता.
परंतु आता प्रस्तावात काही बदल करण्यात आल्यानंतर, नवे उभारण्यात येणारे विमानतळ भारतीय हवाई दलाकडून चालवण्यात येणार आहे. यामुळे लक्षद्वीपमध्ये नौदलाबरोबर हवाई दल देखील मजबूत होणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर हे बेट चांगलेच चर्चेत आले आहे. यातच आता मोदी सरकारने विमानतळ बांधण्याचा निर्णय घेतल्यामुळे
लक्षद्वीपने सर्वांचे लक्ष वेधले आहे.