मुंबई | पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. महाराष्ट्र सरकारने पंतप्रधानांशी जुळवून घेतलेच आहे. मुळात ‘ वाकडे-तिकडे ‘ काही नव्हतेच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कोठे? जे गुन्हेगार आमच्याबरोबर आहेत ते सोडले जातील. जे भाजपबरोबर नाहीत त्यांना विनाकारण त्रास देऊन अडकवले जाईल हे धोरण पश्चिम बंगालात राबवले तेच महाराष्ट्रात राबविण्याची तयारी आधीच सुरू झाली असल्याचे शिवनसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पंतप्रधान मोदींशी जुळवून घेण्याची विनंती केली. तसेच सेनेने भाजपशी पुन्हा युती करावी, असंही म्हटलं आहे. यावर संजय राऊत अग्रलेखात म्हटले आहेत की, ‘विनाकारण त्रास’ असा काही नाहक प्रकार सुरू असेल तर पंतप्रधान मोदी यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विनाकारण त्रास प्रकरणावर दाद मागता येईल किंवा सरनाईकांचे पत्र जसेच्या तसे त्यांच्या माहितीसाठी पाठवता येईल.
ऐन निवडणूक मोसमात तृणमूलच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा फास आवळला गेला होता. एवढेच नव्हे तर, विधानसभा निवडणूक जिंकूनही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री व इतर दोघांना ‘नारद’ घोटाळ्यात बेकायदेशीर अटक केली गेली. तेव्हा ममता बॅनर्जी यांनी स्वतः सीबीआय कार्यालयात घुसून सगळय़ांचीच दाणादाण उडवली. त्या घोटाळ्याचे इतर दोन प्रमुख नेते भाजपमध्ये गेल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे सीबीआयने टाळले. ‘विनाकारण त्रास’ जो काही आहे तो हाच, असंही राऊत अग्रलेखात म्हटलं आहे.
पत्रामुळे परिवर्तनाची चाहूल लागले लोक राजकारणातील कच्चे लिंबूच
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रात इतर बरेच विषय मांडले आहेत. ते त्यांचे वैयक्तिक मत असेल. एका आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले यावर प्रतिक्रिया द्यावी असे खास काहीच नाही, पण या पत्रामुळे महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाची नवी चाहूल लागली असे काहींना वाटत आहे. ते सर्व लोक राजकारणातील कच्चे लिंबूच म्हणायला हवेत, असा टोला राऊतांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.