औरंगाबाद – कोरोना व अन्य आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्येत रक्त, लघवी व अन्य तपासणीच्या नावाखाली पॅथॉलॉजी लॅबनी लातूर जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कुठे पॅथॉलॉजिस्ट कोऱ्या लेटरपॅडवर स्वाक्षरी करून निघून जातात तर कुठे त्यांची स्वाक्षरी रिपोर्ट तयार करणाराच करतो. संगणकीय प्रयोगशाळेत तर पॅथॉलॉजिस्टची स्वाक्षरी स्कॅन करूनच ठेवली जाते. या गोंधळात एका महिला रुग्णाचा दिलेला अहवाल लॅबने दहा मिनिटांत बदलून दिला आणि रुग्णाकडून घेतलेले शुल्कही गुपचूप परत करून टाकले.
लातूर शहरातील एका लॅबमध्ये शनिवारी घडलेल्या या प्रकाराची वैद्यकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शहरातील एका कॉप्युटाराईज्ड पॅथॉलॉजिकल लॅब्रोटरीमध्ये शनिवारी एकाने त्याच्या आईची लुपीड प्रोफाइलची स्वतःहून तपासणी केली. काही वेळानंतर लॅबमधून अहवाल (रिपोर्ट) देण्यात आला. त्यात व्हेरी लो डेन्सीटी लिपीडचे (व्हीएलडीएल) प्रमाण 119 टक्के मिलीग्रॅम दाखवण्यात आले होते. सर्वसाधारण हे प्रमाण 34 टक्के मिलिग्रॅम असायला हवे. एवढे प्रमाण पाहून संबंधित व्यक्तीला धक्का बसला. या प्रमाणात रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. रिपोर्टवरून संबंधित पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरने तातडीने रुग्णाला सल्ला देणे बंधनकारक आहे. व्यक्तीला याची माहिती असल्याने त्याने रिपोर्टबाबत लॅबमधील कर्मचाऱ्याला जाब विचारला. त्याने पुन्हा तपासून पाहण्याचे सांगून दहा मिनिटांत परत येण्याची सूचना व्यक्तीला केली. दहा मिनिटांनंतर व्हीएलडीएलचे 23.8 टक्के मिलिग्रॅम करून नवीन अहवाल दिला. काही तपासण्या मशीनद्वारे करून उर्वरित माहिती गणितीय आकडेमोड करून देण्यात असल्याचे सांगत कर्मचारी दुरुस्त अहवालाचे समर्थन करू लागला. यानंतर संतप्त व्यक्तीने डॉक्टरांची भेट घेऊन त्यांची चांगलीच कानउघाडणी केली व शुल्क परत देण्याची मागणी केली. त्यानंतर डॉक्टरने तातडीने शुल्क परत दिले.
कोणाचेही नियंत्रण नाही –
यानिमित्त पॅथॉलॉजी लॅबचा राम भरोसे कारभार पुढे आला असून, रुग्णांना या लॅबच्या अहवालावर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लॅबवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचेही समोर आले. लॅबवाल्यांचे डॉक्टरांसोबत असलेले लागेबांधे लपून राहिलेले नाहीत. काही डॉक्टरांच्या स्वतःच्याच लॅब असून, त्यातून रक्त व अन्य तपासणीसाठी हजारो रुपये उकळले जात आहेत. तपासणीचे दर निश्चित नसल्याने मनमानी पद्धतीने आकारणी केली जाते. कोरोनासाठी करण्यात येणाऱ्या रक्त तपासणीसाठीही पाच हजार रुपयांपर्यंत शुल्क घेतले जात आहे.