वर्ल्डकप फायनलवरून रोहित शर्मा – राहुल द्रविडवर गंभीर आरोप

rohit sharma rahul dravid
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील (Cricket World Cup 2023) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा दणदणीत पराभव केला आणि करोडो भारतीय क्रिकेटप्रेमींचं स्वप्न भंगले. या गोष्टीला आता खूप दिवस झालेत, मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) वर्ल्डकप फायनलवरून कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड या जोडगोळीवर गंभीर आरोप केला आहे. रोहित-द्रविडने पीचमध्ये बदल केला असा थेट आरोप कैफने केला आहे.

मोहम्मद कैफने ललनटॉपला मुलाखत देताना 2023 विश्वचषक फायनलच्या खेळपट्टीवरून रोहित शर्मा आणि राहुल द्रविडवर निशाणा साधला आहे. कैफ म्हणाला, मी माझ्या डोळ्यासमोर पीचचा रंग बदलताना पाहिलाय. मी त्याठिकाणी ३ दिवस होतो. त्या संध्याकाळी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) खेळपट्टी पाहायला आले, म्हणाले कसली खेळपट्टी आहे ही… त्यानंतर पीचवरुन जबरदस्ती गवत हटवलं. कमी पाणी मारायला लावलं, का तर ऑस्ट्रेलियाकडे पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क सारखे गोलंदाज आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी संथ खेळपट्टी तयार करू.. पण तिथेच चूक झाली असं कैफने म्हंटल.

कैफ पुढे म्हणाला, “खेळपट्टीवर गवत आणि पाणी नसल्यामुळे ती खूपच संथ झाली होती. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क आग ओकणारी गोलंदाजी करत होते हे खरं आहे, पण तुम्ही सतत खेळपट्टी पाहत असताना, तुम्ही क्युरेटरशी संवाद साधला पाहिजे. तुम्ही फक्त दोन ओळी म्हणाल्या की खेळपट्टीला पाणी देऊ नका आणि गवत कमी करू नका. लोक म्हणतात क्युरेटरने आपले काम चोख बजावले पण हे सगळं बकवास आहे असं म्हणत मोहम्मद कैफने स्पष्टपणे
रोहित शर्मा आणि राहुल द्रविडवर निशाणा साधला.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलन्दजी पूर्णपणे ढेपाळली. संथ खेळपट्टीवर एक एक रन काढताना टीम इंडियाच्या फलंदाजांना घाम फुटत होता. अखेर ५० षटकात कशाबशा २४० धावा भारताला करता आल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने सलामीवीर ट्रेव्हिस हेडच्या आक्रमक शतकाच्या जोरावर ६ गडी राखून विजय मिळवला आणि तब्बल पाचव्यांदा वर्ल्डकप वर आपलं नाव कोरल.