कराड | तालुक्यातील मसूर येथे मार्च महिन्यात दरोडा घालणाऱ्या आंतर जिल्हा टोळीसह दरोडेखोरांकडून सोने विकत घेणाऱ्या सोनाराविरुद्ध मोक्का लावण्यात आला आहे. अप्पर पोलिस महासंचालकांकडून दोषारोप पाठविण्यास मंजुरी मिळाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व पथकाने केलेल्या तपासाला यश आले असल्याची माहिती उंब्रजचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.
या प्रकरणातील होमराज ऊर्फ होम्या उद्धव काळे (वय-31, रा. वाकी शिवार, ता. आष्टी), अजय उर्फ आज्या सुभाष भोसले (वय- 23), सचिन उर्फ आसी सुभाष भोसले (वय- 24), अविनाश उर्फ अवि उर्फ महिंद्रा सुभाष भोसले (वय- 22), रुस्तुमबाई सुभाष भोसले (वय- 55), सोनार निलेश संतोष पंडित (सर्वजण रा. माही जळगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर), राहुल उर्फ काळया पद भोसले (वय- 28, रा. वाळूज पारगाव, पोस्ट पाथर्डी, ता.जि. अहमदनगर), गणेश उर्फ बन्सी रंगीशा काळे (रा राशीन, ता. कर्जत, जि. अहमदनगर) त्यांचे विरुद्ध दोषारोप पाठविणेस मंजुरी दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मसूर येथे 2 मार्च 2022 रोजी रात्री डॉक्टर संपत इराप्पा वारे यांच्या बंगल्याचे दार कटावणीने उचकटून आतील कडी काढून डॉक्टर दाम्पत्यास शस्त्राने जबरी मारहाण केली. तसेच घरातील लोकांना जीवे मारण्याची दमदाटी करत दहशत माजवून घरातील लोकांकडून जबरीने कपाटाच्या चाव्या घेतल्या. त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 5 लाख 9 हजार 500 रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला होता. गुन्ह्याचा तपास उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि अजय गोरड यांनी तपास केला. सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने निष्पन्न केलेल्या पाच संशयितांनी मसूर येथील दरोड्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील काही अंशी माल हस्तगत केला.
गुन्ह्यांतील मुख्य संशयिताकडून सोन्या-चांदीचे दागिने चोरीचे असल्याचे माहित असूनही दागिने घेणाऱ्या दोघांचा समावेश आरोपीमध्ये करण्यात आला आहे. संघटित गुन्हे करणाऱ्या सदर संशयित आरोपीं विरुद्ध विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे मोक्या कायद्यान्वये कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यामार्फत पाठवून दिला होता. त्यास पूर्वपरवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील हे करीत होते. तपासी अधिकाऱ्यांनी संशयितांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती संकलित केली. त्यापैकी एका फरार संशयितास शिताफिने अटक केली. निष्पन्न सर्व संशयितां विरोधात पुरावा गोळा करून दोषारोपपत्र मंजुरी करता अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी त्यास मंजूरी दिली असल्याचेही पोलिसांनी सांगितले.