पुणे प्रतिनिधी | पैसा असल्याशिवाय राजकारण करणे शक्य होत नाही अशी परिस्थिती आज राज्याच्या आणि देशाच्या काहीही भागात बनून बसली आहे. त्यामुळे राजकारणाच्या सुदृढ परिस्थितीसाठी हि परिभाषा बदलायला पाहिजे असे मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.
माणूस परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून आदर्श कार्यकर्ता गौरव समितीचा पहिला आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आमदार बच्चू कडू यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते. बच्चू कडूंची आंदोलने म्हणजे सरकारी अधिकाऱ्याना मारहाण करण्याची आंदोलने असा लोकांचा समज आहे. मात्र बच्चू कडू रस्ता होत नाही म्हणून रक्तदान करून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेद करतो हे माध्यमात कुठेच दिसत नाही असे बच्चू कडू म्हणाले.
ज्याची खर्च करण्याची आयपत आहे अशांनाच निवडणुकीत तिकीट दिले जाते. हि परिस्थिती सर्वच पक्षांमध्ये आहे त्यामुळे या बाबत सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना या संदर्भात प्रश्न विचारले पाहिजेत. पैशावर राजकारण हिची परिभाषा आगामी काळात बदलली पाहिजे. जो कार्यकर्ता काम करतो त्यालाच तिकीट मिळाले पाहिजे जेणेकरून लोकांच्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार होईल असे बच्चू कडू म्हणाले आहेत.