हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Monsoon In Mumbai । अखेर आज मुंबईत मान्सून दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. तळ कोकणातून मान्सून 24 तासांहून कमी वेळात अत्यंत वायुवेगानं मुंबईत धडकला असल्याचं वृत्त हवामान विभागाने दिले आहे. विशेष बाब म्हणजे मान्सूनने ५५ वर्षांचा रेकॉर्ड तोडत 16 दिवस आधीच मुंबईत आगमन केलं आहे. यंदा मे महिन्यातच मान्सून मुंबईत आल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या नैऋत्य मान्सूननं मुंबई, कर्नाटक, बंगळुरू, तामिळनाडूचा उर्वरित भाग, तेलंगणाचा काही भाग, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर, मिझोरम, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयचा काही भाग व्यापला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि सोलापूरचा भाग मान्सूनने व्यापला असून पुढील २ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यंदा मान्सून खूपच लवकर महाराष्ट्रात आणि मुंबईत दाखल झाला आहे. यापूर्वी 1956, 1962 आणि 1971 मध्ये 29 मे रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता. मात्र, यंदा पहिल्यांदाच मान्सूनने मुंबईत लवकर एंट्री केली आहे. Monsoon In Mumbai
हे पण वाचा : मुंबईत दिवसाही अंधार, सखल भाग पाण्याखाली, वाहतूक कोंडी कायम
48 तासांत मुंबईचा समुद्र खवळण्याची शक्यता- Monsoon In Mumbai
दरम्यान, मुंबई मुख्य शहर आणि उपनगरांमध्ये हवामान आणखी खराब होण्याची शक्यता असून पुढील 48 तासांत मुंबईचा समुद्र खवळण्याची शक्यता आहे. उंचच उंच लाटा रस्त्यावर येण्याचा अंदाज आहे. मुंबई शहरातील समुद्र 18 दिवस खवळणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत रात्रभर तुफान पाऊस झाला. तर आज सकाळी देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. सर्वत्र ढग दाटून आल्याने अंधेरी, वांद्रे, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव परिसरात अंधाराचे वातावरण तयार झालं. पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गाड्या धीम्या गतीने पुढे जात आहेत. तस बघितलं तर बोरिवली ते वांद्रे हा एक तासाचा प्रवास आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत याच प्रवासाला ३ तास लागत आहेत. त्यामुळे नोकरीसाठी घरातून बाहेर पडललेया नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. सध्या वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे




