व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज्यातील 1 लाख पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्येच्या विचारात; सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. नुकत्याच, एका करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार मराठवाड्यात १ लाख ५ हजार ७५४ शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्याचे प्रमाण रोखण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी १२ टप्प्यात ५ लाख कुटुंबाची सर्वेक्षण मोहीम राबवली होती.

या सर्वेक्षणामध्ये १०० प्रश्न तयार करून तब्बल १० लाख कुटुंबांकडून माहिती भरून घेण्यात आली होती. या सर्वेक्षणामध्ये आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांची एक वेगळी यादी तयार करण्यात आली होती. या यादीच्या अहवालानुसार, राज्यांतील १ लाख ५ हजार ७५४ शेतकरी कुटुंब आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतीविषयी निर्माण होणाऱ्या प्रश्नांना कंटाळून शेतकरी आत्महत्येचा विचार करत आहेत.

मुख्य म्हणजे, यातील तब्बल २ लाख ९८ हजार ५१ शेतकरी कुटुंब आत्महत्येच्या विचाराबाबत संवेदनशील आढळून आले आहेत. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी शेतकरी आहेत. तसेच नापिकी, खतांचे वाढते दर, अतिवृष्टी, मुसळधार पाऊस असे अनेक कारणे शेतकऱ्यांना वैतागून सोडत आहेत. या सगळ्यांमध्ये सरकार देखील त्यांना साथ देताना दिसत नाही. अशा सर्व इतर कारणांमुळे शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. केंद्रेकर यांच्या अहवालानुसार, औरंगाबाद विभागात २०१२ ते २०२२ मध्ये एकूण ८ हजार ७१९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे. यातील नापिकीमुळे ९२३, कर्जबाजारीपणामुळे १ हजार ४९९, नापिकी ४ हजार ३७१ आत्महत्या अशा कारणांवरून करण्यात आले आहेत.

दरम्यान सुनील केंद्रेकर यांनी केलेल्या सर्वेक्षणाची दखल घेत सरकार शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रेकर यांच्या सर्वेक्षणामुळे मराठवाड्यातील सत्यपरिस्थिती समोर आली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्याचा विचार करत आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आता यावर सरकार काय उपाययोजना राबवेल हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.