परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणी जिल्ह्यातील रहाटी याठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेत एका कुटुंबासोबत अशी घटना घडली जी एका क्षणात होत्याचे नव्हतं झालं. यामध्ये ऑटो रिक्षातून कुटुंबासह परभणीच्या दिशेनं जात असताना, वाटेत झालेल्या भीषण अपघातात आईसह 8 महिन्याच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे तर वडील वडील या अपघातात गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच आसपासच्या लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण प्राथमिक तपासणी करत डॉक्टरांनी बाळासह आईला मृत घोषित केले.
काय आहे प्रकरण ?
पद्मिनी मुंजाजी शिंदे असे मृत पावलेल्या आईचे नाव आहे तर वैभव मुंजाजी शिंदे असे आठ महिन्याच्या बाळाचे नाव आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पूर्णा तालुक्यातील बरबडी येथील रहिवासी असलेले मुंजाजी शिदे आपल्या पत्नी आणि 8 महिन्याच्या बाळाला घेऊन परभणीच्या दिशेनं जात होते. यादरम्यान वसमत ते परभणी या राष्ट्रीय महामार्गावर रहाटीजवळ जरा खराब रस्ता आहे. याठिकाणी रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवत असताना एका अज्ञात वाहनाने मुंजाजी शिदे यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली आणि ऑटो रिक्षा उलटली.
या अपघातात आईसह आठ महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर वडील मुंजाजी शिदे गंभीररीत्या जखमी झाली आहेत. या अपघातानंतर या कुटुंबाला आसपासच्या नागरिकांनी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच आई आणि बाळाचा मृत्यू झाला होता. तर जखमी वडील मुंजाजी शिदे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.