कराड | संसारोपयोगी साहित्य घेऊन घराबाहेर राहण्यास निघालेल्या मुलाला अडविल्यानंतर मुलाने आईला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच पत्नी व भावालाही त्याने शिविगाळ करीत दांडक्याने मारले. उत्तर पार्ले, ता. कराड येथे सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत उषा अरुण मदने (रा. उत्तर पार्ले, ता. कराड) यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. विकास अरुण मदने असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर पार्ले येथील उषा मदने यांचा धाकटा मुलगा विकास सोमवारी घरातील संसारोपयोगी साहित्य पोत्यात भरुन बाहेर राहण्यास निघाला होता. उषा यांनी त्याला अडवले. तसेच साहित्य माझे आहे, तु घेऊन जाऊ शकत नाहीस, असे त्यांनी सुनावले. त्यावर विकास याने हे साहित्य माझे आहे, मी घेऊन जाणारच, असे म्हणत साहित्य भरले.
यावेळी आई उषा यांनी अटकाव केल्यानंतर त्याने तीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी विकासची पत्नी त्याठिकाणी आली असताना त्याने तिलाही मारहाण केली. या प्रकारानंतर मोठा भाऊ सुजीत त्याठिकाणी आला. मात्र, विकासने त्यालाही मारहाण केली. याबाबत उषा मदने यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरुन विकास मदने याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.