काॅलेज युवतीची छेडछाड काढणाऱ्यास एक वर्ष कैद व दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिची छेडछाड करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने संशयितास एक वर्षाची सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच दंड न भरल्यास पुन्हा एक महिन्याची साधी कैद शिक्षा सुनावली आहे. सडकसख्याहरींकडून मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले असून त्याला आळा घालण्यासाठी कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश के. एस. होरे यांनी दिलेली ही शिक्षा महत्त्वपूर्ण मानली जात असल्याची माहिती सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. राजेंद्र सी. शहा यांनी दिली. संतोष उत्तम पवार (वय- 32, रा. आगाशिवनगर, ता. कराड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

याबाबत अ‍ॅड. राजेंद्र सी. शहा यांनी सांगितले की, संतोष पवार याने जानेवारी 2021 मध्ये विद्यानगर (ता. कराड) येथील एका कॉलेज परिसरात पीडित कॉलेज युवतीचा पाठलाग केला. मोटरसायकल वरून संबंधित विद्यार्थिनीच्या पुढे-मागे करून कृष्णा सर्कल ते नवीन पुलाकडे जाणार्‍या सार्वजनिक रस्त्यावर पीडित मुलीचा हात पकडून ’तू मला आवडतेस’ अशी भाषा वापरून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. संबंधित पीडित महाविद्यालयीन विद्यार्थिनीने ही बाब आपल्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी शिक्षण घेणार्‍या मुलींना वारंवार त्रास होत असल्याने याची गंभीर दखल घेत कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. चोरगे यांनी तपास केला. त्यानंतर संशयिताला अटक करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायाधीश के. एस. होरे यांच्या न्यायालयात या खटल्याचे सुनावणी झाली. सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र सी. शहा यांनी युक्तिवाद केला. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. या कामी पीडित मुलगी व तिची मैत्रीण तसेच पंच व तपासी अधिकारी यांनी नोंदवलेल्या साक्षी व सरकारी वकील यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने संशयितास एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाचे शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास एक महिने साधी कैद अशीही शिक्षा न्यायालयाने दिली आहे. अ‍ॅड. राजेंद्र सी. शहा यांना कॉन्स्टेबल अशोक मदने, गोविंद माने, गोरे, पवार, पाटील यांनी सहकार्य केले.