सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
शिवसेनेचे बंडखोर आमदार, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील घरासमोर साताऱ्यातील शिवसैनिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलकांना पोलिसांनी अडविले असून ताब्यात घेतले आहे. मात्र, यावेळी गद्दारांना माफी नाही म्हणत शिवसैनिकांनी बंडखोरी करणाऱ्या आमदारांचा निषेध केला.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांनी बंडखोरी केलेली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील आ. महेश शिंदे आणि आ. शंभूराज देसाई यांचाही समावेश आहे. गेल्या दोन दिवसापासून शिवसैनिकांच्यात दोन गट पडलेले आहेत. शिंदे व उध्दव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी शिवसैनिक सरसावले आहेत. सातारा जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ महाबळेश्वर, सातारा, कराड, कोरेगाव, पाटणसह अनेक ठिकाणी बॅनरबाजी केली आहे. तर अनेक ठिकाणचे बॅनर हटविण्याचा प्रयत्न उध्दव ठाकरे यांना पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांना केला, तसेच घोषणाबाजीही केली.
साताऱ्यात आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन : गद्दारांना माफी नाही'ची घोषणाबाजी@HelloMaharashtr @shambhurajdesai @DesaiShambhuraj pic.twitter.com/CUFZVQWEjn
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) June 25, 2022
आज शनिवारी दुपारी 1 वाजता सातारा येथे संतप्त आंदोलक शिवसैनिकांना पोवई नाक्यावर आ. शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी जाण्यापासून रोखलं. त्यामुळे शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. शंभूराज देसाई यांनी शिवसेना पक्षाशी गद्दारी केली असल्याचा आरोप करत, गद्दारांना माफी नाही म्हणत शिवसैनिकांनी निषेध केला. देसाई यांच्या घराबाहेर पोलीस छावणीचे स्वरूप आले असून बंडखोर आमदारां विरोधात साताऱ्यातील शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत.