सांगली प्रतिनिधी । संपूर्ण देशात महागाईचा आलेख वाढतच आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. महागाईवर कोणतेही उपाययोज़ना केंद्र सरकार करत नाही. याच्या निषेधार्थ सांगलीतील स्टेशन चौक येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनवादी महिला संघटनेच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊन देखील राष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत नाहीत. भाजप शासित केंद्र सरकारच्या काळात कच्या तेलाची किंमत प्रति बॅरेल ३५ डॉलर होऊन देखील त्याचा फायदा जनतेला न मिळत केवळ खाजगी कंपन्यांना देण्यात येत आहे. पाच राज्यांच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन गेल्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले. एका बाजूला हा निर्णय घेतला असताना दुसऱ्या बाजूला या किमतीवर सरकारचे नियंत्रण नाही असे सांगण्यात येत आहे.
गॅस सिलेंडर हि सामान्य जनतेची गरज निर्माण झाली आहे. कोविडचे कारण पुढे करून सरकारने गॅसवर मिळणारे अनुदान देखील बंद केले. या सरकारच्या काळात गॅसचे दर दुपटीहून अधिक झाले आहेत. खाद्यतेल, डाळी यांचेही दर सामान्य जनतेच्या आवाक्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेचं या महागाई मुळे कंबरडं मोडलं आहे. केंद्र सरकारने तातडीने पाऊले उचलून महागाई कमी करण्यात यावी या मागणीसाठी स्टेशन चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलन उमेश देशमुख, रेहाना शेख, दिगंबर कांबळे, तुळशीराम गळवे, दिलीप कांबळे, संजय गलगले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.