औरंगाबाद – राज्य सरकारने नुकतेच राज्यांमध्ये सुपरमार्केटमध्ये वाईन ठेवण्यास परवानगी देण्याचे आदेश काढले आहे. यावर खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सुपरमार्केटमध्ये आणि दुकानात वाईन विकू दिले जाणार नाही, तर शिवसेनेच्या मंत्री व नेत्यांनी दुकानांचे उद्घाटन करावे आम्ही ती फोडून काढू असे खुले आव्हान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे. राज्य शासनाच्या वतीने महामार्गावरील दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु ते दुकाने परत सुरू झाले आहेत. एकीकडे दारुवर प्रतिबंध घालण्याऐवजी राज्य सरकार आता सुपरमार्केटमध्ये दारू विकण्यास परवानगी देत आहे. यामुळे लहान मुलाला याची चटक लागून तरुणपणी ते बिअर, विस्की व रम हे घेण्यास प्रवृत होतील
यासाठी राज्यातील सर्व माता भगिनींनी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जिथे कुठे सुपरमार्केटमध्ये वाईनची दुकाने दिसतील ते तात्काळ फोडण्यात येतील असा इशारा इम्तियाज जलील सोमवारी दिला. एकीकडे राज्य सरकारच्या या निर्णयाच्या काही पक्ष निषेध नोंदवत आहेत. परंतु आम्ही निषेध नोंदवत आता थेट दुकाने फोडून टाकू असे ते म्हणाले. राज्य सरकारने नियम केले आहेत. पण ते नियम मोडून पण आम्ही दुकाने फोडू. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे राज्य सरकार सांगते, तर मग शेतकऱ्यांना गांजा व चरस हे उत्पादन घेण्यासाठी परवानगी द्यावी.
तसेच वाईनऐवजी दूधाला महत्त्व द्यावे, असे इम्तियाज जलील म्हणाले. औरंगाबाद शहरात एकाही ठिकाणी वाईन बार सुरु झाल्यास त्यावर हल्लाबोल करून तोडफोड करण्यात येईल असा इशारा जलील यांनी दिला. राज्य शासनाने शॉपिंग मॉल आणि किराणा दुकानात वाइन विक्रीला दिलेली परवानगी तात्काळ मागे घ्यावी, अशी विनंती देखील खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. काँग्रेसवाले निंदा करतात. आम्ही थेट फोडून टाकू, मी स्वत: औरंगाबादेत दुकाने फोडणार, असे जलील यांनी सांगितले