सातारा | साताऱ्याचे खा.उदयनराजे भोसले यांनी मोक्क्यातील एक आरोपी असलेल्या नगरसेवकाला जामीन मिळाल्यानंतर साताऱ्यात पत्रकार परिषदेत साताऱ्यातील पोलिस प्रशासन आणि सरकारी वकील यांचा समचार घेतला. लोकप्रतिनिधीचा पोलीस आणि प्रशासनावर दबाव वाढतोय असा आरोप केला आहे. यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे आणि हे लोकशाही ला मारक असल्याचे सांगत काही लोक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देतात, त्यांना निवडून आणतात, त्यांच्या मार्फत दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न होतोय. असच चालू राहील तर जंगलराज येईल असं देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
खा. उदयनराजे म्हणाले, आमदार, खासदार, मंत्र्यांच्या दबावापोटी तुम्ही वागणार असाल तर पिडीतांनी दाद मागायची कुणाकडे? प्रकरण दाबले जाते, पिडीताला धमकावले जाते. अनेक पिडीतांवर विविध प्रकारे अन्याय झाला पण ते करणार काय? काही लोकप्रतिनिधी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देतात आणि निवडूनही आणतात. ज्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबर दुखापत करणे, गुन्हेगारी कृत्ये, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल असताना संशयितांना जामीन मिळतो कसा? न्यायालयाची दिशाभूल केली जाते याची खंत वाटते. पोलिस यंत्रणा, जिल्हा सरकारी वकील, असिस्टंट पब्लिक प्रोस्युक्यूटर आदिंनी पिडीताला न्याय मिळवून देण्याऐवजी संगनमत करुन काहीजणांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.’ असा आरोप खासदार उदयनराजे यांनी केला
लोकांवर होणार्या अन्यायाविरोधात आवाज उठवल्यावर तो दाबला जातो. यांना काय कळतंय असं म्हणून मुर्खात काढलं जातं. माझ्यावर केसेस घातल्या गेल्या. ज्यांच्या एमआयडीसीसाठी जमीनी गेल्या त्यांना नोकरीत घ्यावे असे सांगितले. तर 2 लाखांच्या खंडणीची केस 2-3 आठवड्यानंतर घातली. माझ्या बाबतीत असे घडत असेल तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल. राजकारण न आणता राज्य शासनाने निर्णय घ्यावा. हे गुन्हेगार निर्दोष लोकांच्या नरड्यावर सुरी ठेवतील त्यावेळी पोलिसही हस्तक्षेप करणार नाहीत. संगनमताने कारभार सुरु असल्याने ही लयलूट आहे. यावेळी साविआचे पक्षप्रतोद व नगरसेवक अॅड. डी. जी. बनकर, पदाधिकारी उपस्थित होते.