एमपीएससी व रेल्वेची परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा आणि रेल्वे भरतीची परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी म्हणजे २१ मार्च रोजी होत आहेत. या दोन्ही परीक्षांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, या परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.
राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही केंद्रांवर ऑफलाईन पध्दतीने तर रेल्वेकडून नॉन टेक्नीकल पॉप्युलर कॅटेगरी स्वरूपात घेण्यात येणारी ही परीक्षादेखील ऑनलाईन, परंतु एकाच केंद्रावरच होणार आहे. औरंगाबाद शहरातील ५९ केंद्रांवर १९ हजार ६५६ विद्यार्थी राज्यसेवा पूर्वपरीक्षा देणाार आहेत, तर ३२ हजार २0८ जागांसाठीची रेल्वेची परीक्षा आधीच जाहीर झाली आहे. विद्यार्थी या दोन्ही परीक्षांची तयारी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून करीत आहेत. मात्र, एमपीएससीने १४ मार्च रोजी होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आणि राज्यभरात आंदोलन सुरू झाले. शेवटी शासनाने या आंदोलनाची दखल घेउन २१ मार्च रोजी ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. आता दोन्ही परीक्षा २१ मार्च रोजी होणार असल्याने परीक्षार्थींची तारांबळ उडाली आहे. या सगळ्या गोंधळात मागील तीन वर्षांपासून तयारी करणारे होतकरू, शेतकरी कुटुंबातील मुले अत्यंत बिकट परिस्थितीमधून मार्ग काढून अभ्यास करीत आहेत. त्यांना एका परीक्षेची संधी गमावण्याची चिंता लागली आहे.

रेल्वेची परीक्षाही केंद्रावरच –
दोन वर्षांपूर्वीच विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या एनटीपीसी या परीक्षेसाठी अर्ज करून तयारी सुरू केली होती. रेल्वेची ही परीक्षा ३२ हजार २0८ जागांसाठी होत असून, ती मागील काही महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने घेतली जात आहे. ही परीक्षा आॅनलाईन असली तरी परीक्षा केंद्रावरच जाउन द्यावी लागते.

केंद्रावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत –
शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी कडकडीत लॉकडाउन आहे. परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी रिक्षा, शहर वाहतूक बस किंवा इतर साधने उपलब्ध होतील की नाही, हे सांगता येत नाही. प्रामुख्याने परीक्षा देण्यासाठी बाहेरगावाहून येणाºया विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे.