प्रांताधिकार्‍यांनी तलाठ्यांना कार्यालयात बोलावू शिवीगाळ करत दिला चोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इस्लामपूर प्रतिनिधी | प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी तीन तलाठ्यांना सोमवारी रात्री आठच्या सुमारास प्रांत कार्यालयात बोलवून शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार संबंधीत तलाठ्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र राज्य तलाठी संघ सांगली जिल्हा शाखेने प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई होईपर्यंत उद्यापासून वाळवा उपविभागातील तलाठी व मंडलाधिकारी हे लेखणीबंद आंदोलन करीत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अविनाश आनंदराव पाटील, महादेव रामचंद्र वंजारी, अमर मारुती साळुंखे अशी मारहाण झालेल्या तलाठ्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी स्वतः व शिपाई पंडीत कानडे यांच्याकरवी कार्यालयीन वेळेनंतर फोनवरुन अविनाश आनंदराव पाटील, महादेव रामचंद्र वंजारी, अमर मारुती साळुंखे आम्ही तिघांना प्रांत कार्यालयात भेटावयास बोलावून घेतले. त्यांच्या फोनवरुन दिलेल्या निरोपावरुन आम्ही तिघे तलाठी इस्लामपूर येथील प्रांत कार्यालयात पोहचलो. त्यानंतर प्रांताधिकार्यांनी अमर साळुंखे यांना पहिल्यांदा ऑफीसमध्ये बोलावून घेत शिवीगाळ करुन व मोठ-मोठ्याने आरडा-ओरडा करुन मारहाण केली. प्रांताधिकारी नागेश पाटील हे आमच्या सोबत पुर्वग्रहदुषित वृत्तीने वागत आहेत. तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. या मागणीचे निवेदन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेला दिले आहे. तसेच या तक्रारीची दखल घेत सांगली जिल्हा तलाठी संघटनेने प्रांताधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

प्रांताधिकारी नागेश पाटील माझ्याशी व इतर बर्‍याच तलाठ्यांशी पुर्वग्रह दुषित वृत्तीने वागत आहेत. त्यातूनच त्यांनी आम्हा तिघाजणांना मारहाण केली आहे अशी तक्रार अविनाश पाटील यांनी केली आहे. मात्र प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मी ही माणूस आहे. वैयक्तीक पातळीवर जाऊन काही लोक माझ्याबाबत चुकीच्या चर्चा करतात. मी त्यांना याबाबत विचारणा केली आहे. मारहाणीसारखा कोणताही प्रकार घडलेला नाही असे नागेश पाटील यांनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment