MPSC चा पेपर फुटला म्हणून विद्यार्थ्यांचे आंदोलन; आयोग म्हणत पेपर फुटलाच नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ पार पडत आहे. मात्र याच परीक्षेचा पेपर फुटला असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. याच घटनेचा निषेध म्हणून नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केले आहे. मात्र त्यानंतर एमपीएससी आयोगाने मात्र ट्विट करत पेपर फुटलाच नाही असे स्पष्टीकरण दिले.

विद्यार्थी काय म्हणतात-
एमपीएससी पेपर फुटला असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यातील एका विद्यार्थ्याने पेपरसुद्धा दाखवला. विद्यार्थ्यांनी सील केलेले पेपर फुटल्याचे दिसले असाही दावा केला आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना एक विद्यार्थ्यी म्हणाला, पेपर फोडला तेव्हा केंद्र प्रमुख नव्हते. जेव्हा मला पेपर पारदर्शक कागदात दिसला तेव्हा शंका आली. आम्हाला मोबाईल हॉलमध्ये नेता येत नाही. त्यामुळे खाली येवून बॅगमधून मोबाईल घेतला आणि अभाविपच्या संपर्क साधून माहिती दिली

पेपर फुटलाच नाही- आयोगाचे स्पष्टीकरण

दरम्यान, आजच्या राज्य सेवा पूर्वपरीक्षा २०२१ चा पेपर फुटल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर याबाबत राज्य लोकसेवा आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आले आहे.