हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीचे चाहते देशभरात आहेत. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जरी घेतली असली तरी त्याची जादू आणि चाहत्यांच्या मनातील स्थान अजूनही कायम आहे. याचा प्रत्यय यंदाच्या आयपीएल मधेही तुम्हाला पहायला मिळतोय. चेन्नईचा सामना असेल तर खास धोनीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होतेय. परंतु धोनीच्या एका विधानाने मात्र याच चाहत्यांच्या पोटात गोळा येण्याची शक्यता आहे. याचे कारण धोनीने त्याच्या निवृत्तीवर थेट भाष्य केलं आहे.
काल चेपॉक स्टेडियमवरील हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवल्यानंतर धोनीने आपल्या निवृत्तीबाबत बोलताना चाहत्यांना धक्का दिला. हर्षा भोगलेसोबत मॅचनंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये बोलताना धोनी म्हणाला की, चेपॉकवर खेळणं खूप छान वाटत. इथल्या लोकांनी मला खूप प्रेम दिले आहे. तसेच हा माझ्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा आहे, त्यामुळे जितका खेळेल त्याचा त्याला पूर्ण आनंद घ्यायचा आहे असं धोनीने म्हंटल. धोनीने यावर्षीच निवृत्त होणार की नाही हे स्पष्टपणे सांगितलेलं नाही परंतु आपण करिअरच्या अंतिम टप्प्यात आहे असं त्याने म्हंटल्यामुळे तो कधीही निवृत्ती घेऊ शकतो.
दरम्यान, महेंद्रसिंघ धोनी २००८ पासून चेन्नई सुपर किंग्सचा आधारस्तंभ आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने तब्बल ४ वेळा आयपीएल चषक जिंकला असून आयपीएल इतिहासातील यशस्वी संघ म्हणून चेन्नईकडे पाहिले जाते. धोनीच्या आयपीएल कारकिर्दीबाबत सांगायचं झाल्यास आत्तापर्यंत त्याने २४० सामन्यात ५०३७ धावा केल्या आहेत. यामध्ये ८४ धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. धोनीने अनेकदा चेन्नईला एकहाती सामने जिंकवून दिलेलं आहेत. धोनीमुळेच चेन्नईच्या संघाला अनेकांचा मोठा पाठिंबाही आधीपासून मिळत आहे .